संजय राऊतांचा जामीन रद्द होणार का? याचिकेवर आज सुनावणी
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज (11 नोव्हेंबर) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 100 दिवसांनी राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, ईडीनं (ED) कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
संजय राऊत यांच्या जामीन प्रकरणावर सुनावणी घेताना विशेष सत्र न्यायालयाने ईडीला झापलं आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, पत्राचाळ प्रकरणी दोन्ही आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे. दिवाणी खटले हे मनी लॉन्डरिंग किंवा आर्थिक गुन्हे अशा नावाखाली आणून निर्दोष लोकांना त्यात ओढून त्यांना अटक करून अशा परिस्थितीत आणणं हे न्यायालय मान्य करू शकत नाही.
प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली गेली. या प्रकरणात राकेश आणि सारंग वाधवान मुख्य आरोपी असताना त्यांना अटक कऱण्याऐवजी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली. असे न्यायालयाने म्हटले.