संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना यांना ईडीकडून काल मध्यरात्री अटक करण्यात आली. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने अटक केली. दरम्यान, संजय राऊत यांना आज वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांना ईडीने कोर्टात हजर केलं होतं. संजय राऊत यांच्यावतीने अशोक मुंदरगी (Ashok Mundargi) हे त्यांची बाजू मांडत होते. संजय राऊत यांच्यावर जाणीवपूर्वक पद्धतीनं कारवाई केली जातेय, राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर ही कारवाई होतेय असं राऊतांचे वकील म्हणाले होते.
संजय राऊत यांना काल ईडीने अटक केली त्यावेळी त्यांचे कुटुंबिय अत्यंत भावूक झाले होते. त्यांना धीर देण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वत: संजय राऊतांच्या घरी गेले होते. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई ही अत्यंत वाईट पद्धतीनं केली जात असून, संजय राऊत यांच्या हिंमतीचा आपल्याला अभिमान वाटतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांना वाटेल ते करुन अडकवायचं आणि संपवण्याचा प्रयत्न करायचा असं राजकारण भाजपकडून होतोय. मात्र काळ बदलत असतो, 60 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसची अवस्था आज काय आहे हे पाहून लक्षात घ्यायला पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.