नवनीत राणांबाबत केलेल्या 'त्या' विधानावर संजय राऊत ठाम, म्हणाले; "मला मराठी भाषा..."
अमरावतीत ठाकरे गटाच्या सभेत खासदार संजय राऊत यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा नाची असा उल्लेख केला होता. राणांवर केलेल्या शाब्दिक हल्ल्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राऊतांवर सडकून टीका केली होती. तसच भाजपच्या कार्यकर्त्यांनी राऊतांचा तीव्र निषेध व्यक्त केला होता. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली. मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो. मला मराठी भाषा कुणी शिकवायला नको. मी ४० वर्षे बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेला एकमेव माणूस आहे. मी पत्रकार आहे. मी संपादक आहे, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेत आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, बाळासाहेबांचे हिंदुत्त्वाचे विचार सोडले. राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना नाचावं लागत आहे. त्यांचे विचार घेऊन ते समाजात बोलतात. बाळासाहेब ठाकरे असते तर तातडीनं संजय राऊत यांची हकालपट्टी केली असती.
तसच वर्ध्याच्या महायुतीच्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे घणाघाती टीका केली होती. उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून नवनीत राणा १२ दिवस तुरुंगात राहिल्या. पण अजूनही शिवसेनेचे नेते, काँग्रसेचे नेते याठिकाणी येऊन महिलांबद्दल आणि नवनीत राणांबद्दल जे बोलत आहेत, त्याचा ही जनता समाचार घेईल आणि ह्यांचा सुफडा साफ केल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊत यांना इशारा दिला आहे.