खासदार संजय राऊतांचं मातोश्रीवर मोठं विधान; म्हणाले, "वसंत मोरे यांचं शेवटचं डेस्टिनेशन..."
Sanjay Raut On Vasant More : खूप दिवसांनी भरपूर पाऊस झाला आणि वसंतही फुलला आहे. मी वसंत तात्यांचं मातोश्रीवर स्वागत करतो. लोकसभेनंतर तात्या पुढे काय करणार? असं वाटलं होतं. पण त्यात्याचं शेवटचं डेस्टिनेशन मातोश्रीच असणार याची मला खात्री होती. कारण त्यात्याची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. तात्या अधून मधून इकडे तिकडे गेले असले, तरीही तात्या हे शिवसैनिक आहेत. आता शिवसैनिक मातोश्रीच्या मंदिरात दाखल झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आशीर्वाद दिला आहे, असं मोठं विधान संजय राऊत यांनी वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशादरम्यान केलं.
संजय राऊत पुढे म्हणाले, तात्या शिवसेनेत आल्यानं नक्कीच पुणे, खडकवासला, आसपासच्या सर्व परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांना मजबूत शिवसैनिक मिळाला आहे. आपण सर्वांनी मिळून पुण्यातील शिवसेना पुढे नेऊयात. तात्यांसोबत त्यांचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले आहेत. त्या सर्वांना शिवसेनेच्या परिवारात सामील करून घेताना आम्हाला आनंद होत आहे. आपण सर्व स्वगृही परतला आहात, असं मी मानतो, असंही राऊत म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
दिशा चुकली, असं मी म्हणणार नाही. पण शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो, याचा अनुभव घेतला. तो अनुभव घेऊन तुम्ही आता परिपक्व होऊन स्वगृही परतला आहात. त्यामुळे आज तुमच्या कामाची जबाबदारी मोठी आहे. वसंत मोरे यांच्यासह इतर सहकारी आता स्वगृही परतले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीआधी वसंतराव काय करतात? असा प्रश्न आम्हाला पडला होता. काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न असतो. तुम्ही आधीपासूनच शिवसैनिक होता. मध्यल्या काळात तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना शिवबंधन बांधत असताना, काही जण मला म्हणाले, पहिले आम्ही सुद्धा शिवसैनिक होतो. मग आता शिवसेना सोडल्याबद्दल तुम्हाला शिक्षा तर झाली पाहिजे. ती वसंतराव यांनाही झाली पाहिजे. पुण्यात कित्येक पटीने मला शिवसेना वाढवून पाहिजे, हीच शिक्षा आहे.