छत्रपती संभाजीनगरमधून कुणाला मिळणार उमेदवारी? शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरेही इच्छूक
सुरेश वायभट/पैठण : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केलीय. राज्यातील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम असून महायुती आणि महाविकास आघाडीने याबाबत अधिकृत घोषणा केली नाहीय. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांचे वरीष्ठ नेते बैठका घेत असून चर्चासत्र सुरु आहेत. अशातच काही मतदारसंघात महायुती आणि आघाडीच्या सर्व पक्षांचे नेते उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री (शिंदे गट) संदिपान भुमरे यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे.
आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघावर दोन्ही पक्षांकडून (भाजप आणि शिवसेना) उमेदवारीसाठी दावा केला जात असल्याने युतीमधील संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला निवडणूक लढवण्याची संधी मिळणार, असा सवाल राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघावर दोन पक्षांकडून दावा केला जात असल्याने युतीमधील संघर्ष पाहायला मिळत आहे. "पक्षाने उमेदवारी दिली तर छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी निवडणुक नक्कीच लढवणार. लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा ही दोन लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल, असा दावा संदिनापान भुमरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.