Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर कारचा भयानक अपघात; एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच ठार, 5 जण गंभीर जखमी
छत्रपती संभाजीनगर : सचिन बडे | विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांचं सत्र सुरुच आहे. पुन्हा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. हज यात्रेसाठी मुंबई येथून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात निघालेल्या कारचा वैजापूरजवळ अचानक टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन उलटली.
या भीषण अपघातात कारमधील एक वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला. तर कुटुंबातील अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्राथामिक उपचारासाठी वैजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी येवला येथे पाठवण्यात आले आहे. अख्तर रझा असं मृत्युमुखी पडलेल्या एक वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. तर आझाद अली खान (वय 49), अफताब अली (वय 24), खुशबू आलम खान (वय 26), यास्मिन खान (वय 18), सोहेल आलम खान (वय 30) सर्व राहणार वाशी, मुंबई हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त कुटुंब हे मूळ बिहार राज्यातील छप्रा येथील रहिवासी असून सध्या ते मुंबईतील वाशी परिसरात राहत होते. गया येथून 17 जुन रोजी ते विमानाने हज यात्रेसाठी जाणार होते. त्यासाठी ते आपल्या गावी छप्रा येथे जात होते.दरम्यान, समृद्धी महामार्गावरुन छत्रपती संभाजीनगरकडे जात असतांना जांबरगाव व लासूरगांव दरम्यान त्यांच्या कारचे अचानक टायर फुटले. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला.घटनेची माहिती मिळताच वैजापूर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हज यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबावर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.