Samruddhi Mahamarg: जिल्ह्यातील 58 किलोमिटरचा महामार्ग लोकार्पणासाठी सज्ज
भूपेश बारंगे,वर्धा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा वर्धा जिल्ह्यातील 58 किमीचा मार्ग लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. रविवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते हा मार्ग जनतेच्या सेवेत दाखल होत आहे. या मार्गामुळे जिल्हा मुंबई व नागपूर या नगरांना जोडल्या जाणार असून जिल्ह्याच्या विकासाला मार्ग मोलाचा हातभार लावणार आहे. जिल्ह्यात महामार्गावर लहान मोठे 32 पूल उभारण्यात आले असून 9 उड्डानपुलांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सेलू, वर्धा व आर्वी या तालुक्यातून महामार्ग जात असून 34 गावांचा प्रकल्पामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील महामार्गाची एकुण लांबी 58 किमी इतकी असून मार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. महामार्गाची रुंदी 120 मीटर असून सदर मार्ग 6 पदरी आहे. मार्गावर एकुण 32 पूल उभारण्यात आले आहे. त्यात 5 मोठे व 27 लहान पुलांचा समावेश आहे. महामार्गावरील वाहतुक विना अडथळा होण्यासाठी 9 ठिकाणी उड्डानपूल उभारण्यात आले आहे तर एका आयकॅानिक पुलाचा समावेश आहे.
जिल्ह्यात महामार्गावर एकुण 34 भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले असून त्यात वाहनांसाठी 22 तर पादचाऱ्यांसाठी 12 भूयारी मार्गाचा समावेश आहे. जिल्ह्यात 2 ठिकाणी महामार्ग लगत नवनगरे उभारण्यात येत आहे. ही नवनगरे केळझर व विरुळ जवळ उभारण्यात येत आहे. गणेशपूर व रेणकापूर येथे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसांठी सुविधा केंद्र राहणार आहे तर 2 रेल्वे उड्डानपुलही उभारण्यात आले आहे.
प्रवाश्यांना महामार्गावरुन प्रवास करुन आल्यानंतर जिल्ह्यात ईच्छितस्थळी उतरण्यासाठी येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेस देण्यात आले आहे. याच ठिकाणी टोल प्लाझा देखील उभारण्यात आले आहे. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागात दोन ठिकाणी उन्नत मार्ग अर्थात वन्यजीव उड्डाणपुल उभारण्यात आले आहे.
पर्यावरणपुरक महामार्ग
समृध्दी महामार्ग पर्यावरणपुरक करण्यात आला आहे. नागपुर ते मुंबई या दरम्यान रस्त्याच्या कडेचा 11 लाख 50 हजार झाडे लावल्या जात आहे. वन्यप्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांना जंगलाचे स्वरुप देण्यात आले आहे. मार्गावर कुठेही टोल नाही. मार्गावर प्रवेश करतेवेळी लागणाऱ्या टोलवर वाहनाची नोंद केली जाईल. टोल मात्र मार्गावरून ईच्छितस्थळी उतरतांना भरावा लागणार आहे. त्यामुळे टोलसाठी कुठेही थांबावे लागणार नाही.
781 हेक्टर जमीन, 2,762 कोटींचा खर्च
जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यात महामार्गासाठी एकुण 782 हेक्टर जमीनीचे अधिग्रहन करण्यात आले आहे. त्यातील 701 हेक्टर जमीन रस्त्याच्या कामासाठी तर 81 हेक्टर जमीन रस्त्याच्या इंटरचेंजसाठी अधिग्रहीत करण्यात आली आहे. जिल्ह्यात या महामार्गावर एकुण 2 हजार 762 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.