समृद्धी महामार्गाचं काम 'गायत्री'मुळे झालं बंद; लोकार्पण सोहळा लांबण्याची शक्यता
अहमदनगर | कुणाल जमदाडे : समृद्धी महामार्गाचे (Samrudhi Highway) काम जवळपास पूर्ण होत आले असून काही दिवसांत समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र आता यामध्ये विघ्न येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गाचं काम MSRDC मार्फत गायत्री कंपनीला मिळालं होतं. मात्र गायत्री कंपनीने (Gayatri Project) महामार्गाच्या कामासाठी लावलेल्या वाहनधारकांना मोबदला वेळच्या-वेळी न दिल्याने संतप्त झालेल्या वाहनचालक मालकांनी कोपरगाव (Kopargaon) तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम बंद करण्याची भूमिका घेतली.
मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गाचं काम सुरू असून गायत्री कंपनीने ठेका देऊन लावलेल्या वाहनधारकांचे पगार वेळीच न दिल्याने वाहन चालक मालक आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत आम्हाला आमचे पैसे रोख स्वरूपात मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही समृद्धी महामार्गाचं काम चालू करू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अंदाजे 100 वाहनचालक-मालकांचे 15 कोटी रुपये थकले असून मागील 6 महिन्यांपासून वाहन चालक व मालकांना गायत्री कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतायेत. उडवाउडवीती उत्तरं देऊन गायत्रीच्या अधिकाऱ्यांनी थकलेल्या पैश्याच्या बाबतीत हात वरती केले.
मागील वर्षी मुख्यमंत्रांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार होतं. मात्र काम अपूर्ण असल्याने एक वर्ष विलंब झाला. त्यातच आता 1 मे ला महाराष्ट्र दिनी होणारा उदघाटन सोहळाही पुढे ढकलण्यात आलाय. एवढ्या मोठ्या महामार्गाच्या कामात गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीसारख्या ठेकेदारामुळे दिरंगाई होत आहे. त्यामुळे अद्यापतरी जनतेला या महामार्गाचा लाभ घेण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.