Saharanpur Violence : हिंसाचारातील आरोपींच्या घरावर योगी सरकारचा बुल्डोजर
उत्तर प्रदेशमध्ये शुक्रवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर कानपूर आणि सहारनपूरमध्ये हिंसाचारातील आरोपी आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरांवर बुलडोझर चालवल्याचं समोर आलं आहे. आरोपींच्या घरातील बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कानपूरमधील कारवाईबाबत पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, ज्या इमारतीमध्ये विध्वंस करण्यात आला आहे, ती इमारत हिंसाचाराच्या मुख्य आरोपींशी संबंधित भूमाफियांची आहे.
हिंसाचारासंदर्भात आतापर्यंत 13 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यासोबतच 237 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रयागराज, मुरादाबाद, सहारनपूर, कानपूरसह उत्तर प्रदेशात भाजप प्रवक्त्याने पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. त्यामुळे आता पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालं आहे.
उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 227 हून अधिक लोकांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली. अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, राज्यात याप्रकरणी 227 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये प्रयागराजमधील 68, हाथरसमधील 50, सहारनपूरमधील 48, आंबेडकरनगरमधील 28, मुरादाबादमधील 25 आणि फिरोजाबादमधील आठ जणांचा समावेश आहे.