'4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाची मातीच केली' शपथविधीनंतर सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर थेट निशाणा
महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत यांनी 'शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी मराठा समाजाची मातीच केली' असा हल्लाबोल केला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले की, मराठा समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलं आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. पण मराठा समाजाची त्यांनी मातीच केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केलं. दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय दृष्टीकोणातून न पाहता, राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुणा गोविद्यांना राहिला पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू असे सदाभाऊ खोत म्हणाले. हा मार्ग महाराष्ट्राच्या हिताचा असेल. कोणतही आंदोलन चालवत असताना सरकार आपल्याशी बोलत नसेल तर आंदोलन आक्रमक करायचे असते, सरकार आपल्याशी बोलत असेल तर संवाद आणि चर्चा करावी. यातून मार्ग निघेल. मी ऊसाचं, दुधाचं, सोयाबीनच आंदोलन केलं, कळवा जेलमध्ये गेलो, येरवाड्यात गेलो, लाठ्या काठ्या खाल्या. पण आंदोलन कुठं थांबवायचं हे जर समजलं तर ज्यांच्यासाठी आंदोलन करतो त्यांना न्याय मिळतो असे सदाभाऊ खोत म्हणाले.