"सचिन वाझेला महाराष्ट्र सरकारच्या..."; वाझेच्या लेटरबॉम्बनंतर जयंत पाटील यांची मोठी प्रतिक्रिया
Jayant Patil On Sachin Waze : मुंबई पोलीस दलाचे बडतर्फ अधिकारी सचिन वाझेने अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं वाझेनं म्हटलं आहे. तसच वाझेने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच आता या प्रकरणात नवा ट्वीस्ट समोर आला आहे. वाझे यांनी फडणवीसांना केलेल्या पत्रव्यवहारामुळे जयंत पाटील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सचिन वाझेच्या पत्राबाबत बोलताना जयंत पाटील काय म्हणाले?
सचिन वाझे मला कधीही भेटले नाही. माझा त्यांचा कधीही संबंध आला नाही.गृहमंत्र्यांचा तुरुगांतील गुन्हेगारांशी पत्रव्यवहार चालू आहे. देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक आहेत. जे काही वाझेंनी लिहिलं आहे, ते गंभीर असेल तर देवेंद्र फडणवीस मला सांगतील, असा माझा त्यांच्यावर विश्वास आहे. सिक्वेन्स पाहिली तर दोन वर्ष काहीच नाही. तुरुंगात बसलेला माणूस अचानकपणे पत्र पाठवतो आणि त्याला प्रसिद्धी मिळते. लोकांना जयंत पाटील विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.
त्यांनी माझ्यावर आरोप केला नाही. वर्तमानपत्रात माझ्या नावाचा उल्लेख असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यात गांभीर्य असेल तर गृहमंत्री मला सांगतील. सचिन वाझेला महाराष्ट्र सरकारच्या दयेची गरज आहे.त्यांना बाहेर यायचं असेल तर ते असं करत असतील. सरकारला खूश करण्यासाठी काही लिहिलं असेल, पण जनता सुज्ञ आहे. शेवटी आता निवडणूक समोर असल्याने सगळ्या गोष्टी वापरायच्या ठरवलं आहे. साम दाम दंड भेद याचा वापर सुरु आहे.