सध्या राज्यात डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे; सामनातून जोरदार हल्लाबोल

सध्या राज्यात डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे; सामनातून जोरदार हल्लाबोल

शिवसेनेचा आज 57 वा वर्धापनदिन आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिवसेनेचा आज 57 वा वर्धापनदिन आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला आहे, तर ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. पहिल्यांदाच हे दोन वेगवेगळे वर्धापनदिन साजरे होणार आहेत. यासाठी दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामनातून म्हटले आहे की, महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे. असे अनेक कोल्हे-लांडगे मागील 57 वर्षांत महाराष्ट्राच्या वाघाने शिकार करून फस्त केले आहेत. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील 40 बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले   आणि 'आम्हीच खरी शिवसेना' असे मिरवू लागले. शिवसेना 57 वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या!

शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे. आज बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत. पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. शिवसेना 57 वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी 'सामना' शिवसेनाच जिंकत आली. सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. असे सामनातून म्हटले आहे.

तसेच महाराष्ट्राचा खरा वाघ आणि महाराष्ट्राशी बेइमानी करणारे 'मिंधे' वाघ यातील फरक जनता ओळखून आहे. डरकाळी फोडतो तो वाघ असतो आणि ओरडतो तो लांडगा. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल.अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले. असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com