ऋतुजा लटकेंच्या याचिकेवर आज सुनावणी
अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा राजीनामा काल महापालिकेकडून फेटाळण्यात आला आहे. यामुळे उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महापालिकेविरोधात ऋतुजा लटके यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 'मला निवडणूक लढवता येऊ नये या हेतूनेच राजीनामा मंजूर करून तसे पत्र किंवा आदेश देण्यास विलंब केला जात असल्याचे दिसत आहे. महापालिकेची ही वर्तणूक कुहेतूपर्वक, बेकायदा व मनमानी आहे', तसेच मला नाईलाजाने उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. त्यामुळे माझा राजीनामा तात्काळ स्वीकारण्याचा आदेश पालिकेला द्यावा आणि मला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी द्यावी', असे ऋतुजा लटके यांनी सांगितले.
अंधेरी-पूर्व मतदारसंघाचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. शासकीय नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय कोणतीही निडणूक लढवता येत नाही. यानुसार त्यांनी राजीनामा, एका महिन्याचे वेतन पालिकेच्या कोषागारात जमा केलेले आहे. मात्र अजूनही प्रशासनाने हा राजीनामा मंजूर केलेला नाही. याबाबत आज, गुरुवारी न्या. नितीन जामदार व न्या. शर्मिला घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सकाळी 11 वाजता सुनावणी होणार असून, मुंबई उच्च न्यायालयाकडून संबंधित महापालिकेला नोटीस बजावण्याचे निर्देशही देण्यात आलेत. अशातच अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके ह्या शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच या चर्चेला आता लटके यांनी पूर्णविराम दिला असून यासर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. "आमची जी निष्ठा आहे ती, उद्धव साहेबांसोबतच आहे." असे विधान त्यांनी केले आहे.