रशियाने युक्रेनमध्ये डागली 100 क्षेपणास्त्रे, हल्ल्यानंतर शहरांमध्ये ब्लॅकआउट
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला 9 महिने पूर्ण होत आहेत. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त केली आहेत. पण, युक्रेनने काही शहरे परत घेण्याचा दावाही केला आहे. यामध्ये खेरसन यांचाही समावेश आहे. परंतु, रशियाने मंगळवारी युक्रेनवर एकाच वेळी 100 क्षेपणास्त्रे डागल्याची बातमी समोर येत आहे. कीवमधील दोन निवासी इमारतींना लक्ष्य करून क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत. या. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे शहरातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.
कीवमध्ये हवाई दलाचे प्रवक्ते युरी इग्नाट यांनी युक्रेनियन यांनी सांगितले की, सुमारे 100 क्षेपणास्त्रे आधीच डागली गेली आहेत. रशियन सैन्याने यापूर्वी 10 ऑक्टोबर रोजी 84 क्षेपणास्त्रांचे हल्ले केले होते. खेरसनमधून रशियन सैन्याच्या बाहेर पडल्यानंतर रशियाकडून झालेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. सध्या युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन घोषणा केली आहे.
या हल्ल्याची माहिती देताना कीवचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. ते म्हणाले की, राजधानीवर हल्ला झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पेचेर्स्क जिल्ह्यात दोन निवासी इमारतींना लक्ष्य करण्यात आले आहे. हवाई संरक्षण यंत्रणेने अनेक क्षेपणास्त्रेही पाडली आहेत. हल्ल्यानंतर वैद्यकीय आणि बचाव पथके घटनास्थळी उपस्थित आहेत.