प्रवाशांसाठी मोठी बातमी: रेल्वे बोगीत टीसीच्या मनमानीला लगाम, काय आहे नवीन प्रणाली
धावत्या ट्रेनमध्ये असलेल्या रिकाम्या उपलब्ध सीट्सचे प्रवाशांना ट्रेनमध्येच HHTद्वारे (हॅण्डहेल्ड पोर्टेबल टर्मिनल मशीन) आरक्षणाची सुविधा भारतीय रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नाही तर श्रमशक्ती आणि कानपूर शताब्दी एक्स्प्रेसमध्ये आजपासून या नव्या सिस्टीमची चाचणी सुरू झाली आहे. ती यशस्वी झाल्यास धावत्या ट्रेनमध्ये उपलब्ध रिकाम्या जागा यापुढे टीटीई विकू शकणार नाहीत. एचएचटी मशिनच्या उपलब्धतेमुळे प्रत्येक सीटचा तपशील ऑनलाइन सर्वांना उपलब्ध होईल.
कानपूर शताब्दी एक्स्प्रेसनंतर, रेल्वेने श्रमशक्ती एक्स्प्रेसच्या तिकीट चेकर (टीसी) अर्थात तिकीट तपासणी पथकाला (टीटीई) हँड-हेल्ड टर्मिनल मशीन दिली आहेत. टीटीई आता या मशीन्सच्या मदतीने आरक्षण तक्ता (रिझर्व्हेशन चार्ट) तयार झाल्यानंतर धावत्या ट्रेनमध्ये शिल्लक असलेल्या, रिक्त जागा बुक करेल. त्याची संपूर्ण माहिती रेल्वे सर्व्हरपर्यंत पोहोचेल. पूर्वी मनमानी, छुप्या पद्धतीने जागा विकून पैसे उकळल्याच्या तक्रारी येत होत्या. याशिवाय, रिक्त जागा ऑनलाइन दाखवल्या जाणार असल्यामुळे रेल्वे स्टेशन काउंटरवरूनही या जागा बुक करता येणार आहेत.
अशी असेल नवीन प्रणाली
या नवीन प्रणालीनुसार, चार्ट तयार झाल्यानंतर, जो व्यक्ती वेटलिस्टेड असेल, त्याला चालत्या ट्रेनमध्ये जागा शिल्लक असल्यास, जागा द्यावी लागेल. टीटीईला अतिरिक्त भाडे मोजतानाही गणित करावे लागणार नाही. मशीनवर एका क्लिकवर भाडे कळेल. सध्या उत्तर-मध्य रेल्वेच्या 1,018 चेकिंग कर्मचाऱ्यांना मशीन देण्यात आल्या आहेत. दोन-तीन महिन्यांत देशातील सर्व ट्रेनमधील तपासणी पथकाला मशीन उपलब्ध करून देण्यात येतील.
उत्तर-मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) डॉ. शिवम शर्मा यांनी "न्यूजवर्ल्ड"ला सांगितले, की नवे अत्याधुनिक एचएचटी मशिन्स उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्येच वेटिंग तिकीट कन्फर्म करून मिळण्याची खात्रीशीर व पारदर्शी सोय होईल. चार्ट तयार झाल्यानंतर, प्रतीक्षा तिकीट असलेल्या प्रवाशांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. आसन रिकामे असल्यास प्रतीक्षा स्थिती आणि RAC ची पुष्टी झाल्यावर प्रवाशांचे तपशील टीसीला मशीनवर अपलोड करावे लागतील.
रिझर्व्हेशन चार्ट ट्रेन सुटण्याच्या 15 मिनिटे आधी!
एचएचटी हँड-हेल्ड मशीन रेल्वेच्या इंटरनेट सर्व्हरशी जोडले जाईल. ते आरक्षणाच्या मध्यवर्ती पीआरएस प्रणालीशी जोडल्यामुळे, सध्याच्या काउंटरवरून विकल्या गेलेल्या तिकिटांचे शेवटचे अपडेटही ट्रेन सुटण्यापूर्वी मशीनमध्ये केले जाईल. ट्रेन सुरू होण्यापूर्वी पुढील स्थानकापर्यंत रिकाम्या जागांची माहिती मिळेल. त्यामुळे पुढील स्थानकावर ट्रेन येण्यापूर्वी सध्याच्या रेल्वे काउंटरवरूनही सीट बुकींगही केले जाईल. आतापर्यंत आरक्षणाचा अंतिम तक्ता ट्रेन सुटण्याच्या तीन तास आधी छापून ट्रेनवर चिकटवला जात होता. तोपर्यंत एखाद्या प्रवाशाने ट्रेन चुकवल्यास किंवा नंतर तिकीट रद्द केल्यास टीटीई रिकाम्या जागा मनमर्जीने विकत असे. गरजू, वेटलिस्टेड प्रवाशांना टीसीच्या मागे-मागे फिरत राहून मनधरणी करणे किंवा अधिक रकमेचे आमिष दाखवावे लागायचे. आता डब्यातून प्रवास करणाऱ्या डॉक्टर आणि व्हीआयपी प्रवाशांची माहितीही मशीनवर असेल. भविष्यात या मशीनद्वारे ऑनलाइन पेमेंटही करता येणार आहे.