Ravindra Waikar vs Amol Kirtikar: "ईव्हीएम मशिनच्या प्रकरणात खोलात गेला तर..."; रोहित पवार काय म्हणाले?
Rohit Pawar Press Conference : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर आणि पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या निकालाबाबत गेल्या काही दिवसापासून अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. वायकरांचे जवळच्या नातेवाईकाने मतमोजणी कक्षात फोनचा वापर करून ईव्हीएम हॅक केला होता, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाला या प्रकरणावरून धारेवर धरलं आहे. यावर राज्य निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. मोबाईलवर ओटीपीच्या माध्यमातून ईव्हीएम अनलॉक होत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले आमदार रोहित पवार ?
मुंबईच्या उत्तर -पश्चिम मतदारसंघाचा निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, रवींद्र वायकर यांच्या जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल झाला आहे, मोबाईलही जप्त करण्यात आला आहे, निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, तुम्ही यामध्ये खोलात गेला तर कळेल की मशिन लपवून ठेवल्या होत्या. त्याच्यामध्ये बरंच काही झालेलं आहे. मोबाईल तपासण्यासाठी कुणाला दिला, याचाही अभ्यास करावा लागेल.
बारामती लोकसभा मतदारसंघात एका बँकेत काही चुकीच्या गोष्टी सुरु होत्या, असं सागंत होतो. निवडणूक आयोगाने नोटिस जरी पाठवली असली, तरी आयोगाकडे संपूर्ण व्हिडीओ आहे. आम्ही तो व्हिडीओ मागतोय, पण आम्हाला तो व्हिडीओ देत नाहीत. मोबाईल टेस्टिंगला गेला असला तरी, निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने कारवाई करेल का? हा एक प्रश्न आम्हाला पडला आहे.
निवडणूक आयोगा नावापुरती कारवाई करतं. एखादी नोटिस पाठवतं. पण त्यापुढे काहीच होत नाही. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने खोलात जाऊन केस स्टडी करावी. मला वाटतं, एलॉन मस्क यांच्या प्रश्नाला उत्तर वायकरांच्या जागेबाबत सुरु असलेल्या प्रकरणातून मिळेल. एक स्पेशल केस म्हणून याचा तपास झाला पाहिजे. याची मागणी इंडियाच्या घटक पक्षांनी करावी, असंही रोहित पवार म्हणाले.