फ्लॅट शोधण्याच्या बहाण्यानं आले अन् पैसे, दागिणे लुटून नेले
एका महिलेची आपल्याच ओळखीच्या एका जोडप्याने विश्वासघात करीत घरात ठेवलेले 6 लाख 83 हजार रुपयांचे 42 तोळे सोने व 90 हजार रोख असा 7 लाख 73 हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. चोरी करून पळून गेलेल्या बबलीला नारपोली पोलीसांनी गोवा राज्यातून ताब्यात घेतलं आहे. मोनालीशा पंकज रॉय वय 26 रा . सुरत असे अटक 'बबली' चे नाव असून तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणार 'बंटी' प्रेमचंद भारती, वय 28 रा .दिल्ली हा फरार आहे.
कशेळी येथील एका इमारतीमध्ये दिशा रवींद्र लखाणी या राहत असून, त्यांची मैत्रीण मोनालीसा पंकज रॉय व तिचा पती प्रेमचंद भारती हे फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी येऊन पाच दिवस तिच्या सोबत तिच्याच फ्लॅट मध्ये राहिले. त्या दरम्यान एका रात्री चौघांनी पार्टी करून मद्यसेवन केलं. त्याचा फायदा घेत 'बंटी बबली'ने दिशा लखाणी यांच्या कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केले. त्यानंतर दोघांनीही दुसऱ्या दिवशी तेथून पळ काढला.
दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचं महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी दोघेही गोवा राज्यात असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलीस पथकानं तात्काळ तिथे जात महिला आरोपी मोनालीशा पंकज रॉय हिस मरोर, सालीगाव गोवा येथून ताब्यात घेतलं. तिच्या जवळून 26 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळविलं असून नारपोली पोलीस फरार आरोपी प्रेमचंद भारती याचा शोध घेत आहेत. तर महिला आरोपीस 9 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.