अंबरनाथमध्ये डॉक्टरच्या घरावर दरोडा, तब्बल 1 कोटींचे दागिने लुटले
Ambernath Robbery : अंबरनाथमधील नामांकित डॉक्टर हरीश लापसिया यांच्या घरावर काल रात्री ४ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. या दरोड्यात घरातील तब्बल १ कोटी रुपयांचे सोनं आणि हिऱ्यांचे दागिने दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटले. अंबरनाथच्या कानसई परिसरात डॉक्टर हरीश आणि उषा लापसिया यांचं उषा नर्सिंग होम नावाचं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचाच वरच्या मजल्यावर डॉक्टर लापसिया यांचं घर आहे. काल रात्री ११.३० च्या सुमारास चार सशस्त्र दरोडेखोर या हॉस्पिटलमध्ये घुसले. त्यांनी तिथे असलेल्या नर्स आणि आया यांना चाकूचा धाक दाखवत त्यांचे मोबाईल काढून घेतले आणि त्यांना पेशंटच्या खोलीत कोंडून ठेवलं. (Robbery at doctor's house in Ambernath, jewelery worth Rs 1 crore looted)
त्यानंतर दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावरील डॉक्टर लापसिया यांच्या घरात जाऊन थेट कपाटातील दागिने चोरायला सुरुवात केली. यावेळी डॉक्टर हरीश लापसिया हे त्यांच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होते, तर उषा लापसिया या त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. त्यांना दरोडेखोरांची चाहूल लागताच त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी त्यांचं तोंड दाबत चाकूचा धाक दाखवला आणि कपाटातील डिजिटल तिजोरी काढून घेऊन गेले. या तिजोरीत तब्बल १ किलो सोनं, हिऱ्यांचे दागिने असा १ कोटी रुपयांचा ऐवज होता.
दरोडेखोरांनी जाताना सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून नेला आणि हॉस्पिटलच्या दाराला बाहेरून कडी लावली. यानंतर उषा लापसिया यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना याची माहिती देताच शेजारी मदतीला धावले आणि सर्वांची सुटका केली. या घटनेप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून या दरोड्याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.
डॉक्टर उषा लापसिया यांच्यासोबत यापूर्वी जून महिन्यात चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. तर त्यानंतर त्यांच्यासोबत ऑनलाईन फ्रॉडचाही प्रकार जून महिन्यातच घडला होता. यानंतर आता त्यांच्या घरी दरोडा पडल्यानं एखाद्या माहितीतल्याच व्यक्तीचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होतेय.