डोंबिवली शहरातील रस्ते होणार खड्डे मुक्त, दिवाळीपूर्वी केडीएमसी ॲक्शन मोड
मयुरेश जाधव,डोंबिवली : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या तोंडावर केडीएमसी प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे. सलग तीन दिवस ऑन ड्युटी 24 तास ही कामे सुरु राहणार असून दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यंत कल्याण डोंबिवली खड्डे मुक्त होईल असा विश्वास पालिकेचे नवनियुक्त शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी डोंबिवलीत व्यक्त केला आहे.
कल्याण डोंबिवलीत खड्डे भरणीच्या कामास पालिका प्रशासनाच्यावतीने सुरुवात करण्यात आली आहे. आज डोंबिवलीतील टिळक रोडवर सुरु असलेल्या कामाची पहाणी शहर अभियंता अहिरे यांनी केली. यावेळी माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, पालिका सचिव संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे हे देखील उपस्थित होते. आता सुरू असणारे आणि यापूर्वी करण्यात आलेले काम हे चांगल्या दर्जाचे असून पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचे अहिरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम 13 ठेकेदारांना देण्यात आले आहे. मात्र हे ठेकेदार योग्य काम करत नसल्याची तक्रार शहर अभियंता अहिरे यांच्याकडे येताच त्यांनी त्वरीत कनिष्ठ अभियंता वसईकर यांना संपर्क साधला. यावेळी त्यांनी तुम्ही अभियंता आहात, कामाच्या साईटवर उपस्थित का नाहीत. ठेकेदार योग्य काम करत नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम तुमचे आहे. तुम्ही काय कारवाई केली. मग तुम्ही पगार पण लिमिटेड घ्या अशा शब्दांत संबंधितांना खडे बोल सुनावले आहेत. तर येत्या दिवाळीमध्ये विकास कामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीकरांना दिवाळीमध्ये भेट देऊन कल्याण आणि डोंबिवलीकरांना मोठं गिफ्ट यावेळी देण्यात येणार असल्याचं माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केल आहे.