सुधा मुर्तींचा जावई होणार ब्रिटनचा पंतप्रधान? बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानतंर चर्चेला उधाण
UK political crisis live updates : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पक्षातील बंडखोरीनंतर गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. दबाव टाकून दोन दिवसांत कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 41 मंत्र्यांनी राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्यावरील दबावाची ही प्रक्रिया 5 जुलै रोजी सुरू झाली, यूके सरकारमधील अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी राजीनामा दिल्यानंतर या हासचाली सुरु झाल्या. यानंतर आरोग्यमंत्री साजिद वाजिद यांच्या राजीनाम्याने त्यांच्या खुर्चीवरील संकटही वाढलं. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या चार कॅबिनेट मंत्र्यांनी आतापर्यंत राजीनामा दिला आहे. सुनक आणि साजिद वाजिद यांच्याशिवाय सायमन हार्ट आणि ब्रँडन लुईस यांचाही यात समावेश आहे. यामुळे ब्रिटनमध्ये सुद्धा महाराष्ट्रासारखं संकट उभं राहिलंय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
बोरिस जॉन्सन यांच्यानतंर आता जॉन्सन यांच्या सरकारमध्ये भारतीय वंशाचे अर्थमंत्री असलेले ऋषी सुनक (Rishi Sunak) हे देशाच्या पुढील पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पुढे असल्याच्या चर्चा सुरु आहे. सूनक हे इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि ज्येष्ठ उद्योगपती नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. बोरिस जॉन्सन यांनी त्यांची देशाचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती केली अन् ४२ वर्षीय सुनक यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये इतिहास घडवला होता. एका प्रसिद्ध ब्रिटीश बुकीने देखील भाकीत केलं होतं की बोरिस जॉन्सन लवकरच राजीनामा देऊ शकतात आणि ऋषी सुनक त्यांच्या जागी नवीन पंतप्रधान होऊ शकतात. त्यामुळे त्रुषी सुनक हेच आगामी पंतप्रधान झाले तर, जसे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तसे ते ब्रिटनचे एकनाथ शिंदे ठरू शकतात. सुनक यांच्या व्यतिरिक्त पेनी मॉर्डंट, बेन वॉलेस, साजिद वाजिद, लिझ ट्रस आणि डॉमिनिक राब यांचीही नावं पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.
कोण आहेत ऋषी सुनक?
बोरिस जॉन्सन सरकारच्या बहुतेक पत्रकार परिषदांमध्ये ऋषी सुनक हे सरकारचा चेहरा म्हणून समोर येत असतात, यावरुन त्यांच्या लोकप्रियतेचा आणि राजकीय प्रतिमेचा अंदाज लावता येऊ शकतो. कोरोनाच्या काळात त्यांनी ब्रिटनला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ए.डी. पीकचा जोर लावला होता. सर्व वर्गातील लोक त्यांच्या कामावर खूश होते. कोरोनाच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या पर्यटन उद्योगाला त्यांनी १० हजार कोटींचं पॅकेज दिलं होतं.
वादातही अडकले होते ऋषी सुनक
ब्रिटनमधील पार्टीगेट घोटाळ्यामुळे बोरिस जॉन्सनची खूप बदनामी झाली होती. त्याचा फटका सुनक यांनाही बसला होता. पार्टीगेट घोटाळ्याप्रकरणी सुनक यांनाही दंड ठोठावण्यात आला होता. कोविड-19 प्रोटोकॉल दरम्यान, मे 2020 मध्ये पंतप्रधानांच्या डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचे फोटो आणि काही ईमेल लीक झाल्यानंतर हे प्रकरण तापलं होतं. बोरिस जॉन्सन यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफीही मागितली आहे. या प्रकरणानंतर सुनक यांच्या लोकप्रियतेत घट झाली होती. पत्नी अक्षता यांच्यावरही कर बुडवल्याच्या आरोपांमुळे त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागलं आहे.
ऋषी सुनक यांचं शिक्षण आणि कारकीर्द
भारतीय वंशाच्या ऋषी यांचा जन्म यूकेमधील साउथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचा त्यांनी इथे अभ्यास केला. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात फुलब्राइट स्कॉलर होते. इथूनच त्यांनी एमबीएचं शिक्षण देखील पुर्ण केलं. ऋषी सुनक यांनी ग्रॅज्युएशननंतर गोल्डमन सॅक्समध्ये काम केलं, तसंच हेज फंड फर्म्समध्येही ते भागीदार होते. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी अब्जावधी पौंडसची जागतिक स्तरावरची गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी ब्रिटनमधील छोट्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त ठरली होती.