IPL 2024: पंचांशी हुज्जत घालणं ऋषभ पंतला पडणार महागात? माजी दिग्गज फलंदाज म्हणाला, "कारवाई करा..."
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकिपर आणि दिग्गज फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पंतबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सविरोधात झालेल्या सामन्यात ऋषभ पंतने पंचांशी ज्या प्रकारे चर्चा केली, ते पाहून अॅडम गिलख्रिस्ट नाराज असल्याचं समोर आलंय. यावर प्रतिक्रिया देताना गिलख्रिस्ट म्हणाला, जर ऋषभ पंतने सतत असं काही केलं, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. गिलख्रिस्टच्या या प्रतिक्रियेमुळं ऋषभ पंतवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा चर्चा क्रिडाविश्वात रंगू लागल्या आहेत.
लखनऊ सुपर जायंट्स विरोधात झालेल्या सामन्यात पंतने पंचांशी खूप वेळ बाचाबाची केली होती. लखनऊच्या इनिंगच्या चौथ्या षटकादरम्यान वाईडच्या एका रिव्हूयबाबत पंतने पंचांशी चर्चा केली. रिव्हूय गमावल्यानंतर पंत म्हणाला, त्याने रिव्हू घेतला नव्हता. परंतु, जेव्हा रिप्ले समोर आला, तेव्हा स्पष्ट झालं की, ऋषभने रिव्हूय घेतला होता. पण यावर बोलताना ऋषभ म्हणाला, मैदानात आवाज खूप होता. त्यामुळे तो इशारा देऊन खेळाडूंना रिव्हूय घ्यायचा की नाही, हे विचारत होता. मात्र, पंचांना वाटलं की, पंतने रिव्ह्यूची मागणी केली.
या प्रकरणाबाबत अॅडम गिलख्रिस्टने माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटलं, पंचांनी आजच्या सामन्यात खूप चांगल्या नियंत्रणाची गरज होती. ऋषभ पंतच्या रिव्यूबाबत खूप वाद झाला. त्याने डिआरएस घेतला की नाही, यामुळे संभ्रम निर्माण झाला. याबाबत गैरसमज झाले. पण पंतने पंचांशी ३-४ मिनिट चर्चा केली. पंत आणि इतर खेळाडू काय म्हणतात, याने फरक पडत नाही. अंम्पायरने खेळ पुढे चालवायला पाहिजे होता. परंतु, पंत अशाप्रकारची भूमिका सतत घेत असेल, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.