दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षिस; NIA ची घोषणा
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित माहिती देणाऱ्यास २५ लाखांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी ही घोषणा केली. दाऊद हा 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे.
तर त्याचा साथीदार छोटा शकीलवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर अनीस इब्राहिम, जावेद चिकना आणि टायगर मेमन यांच्यावर १५ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या लोकांची माहिती देणाऱ्यास ही रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि टोळीतील इतर सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याचा तपास एनआयए करत आहे. यामध्ये मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांचाही समावेश आहे. यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात टाडा न्यायालयाने दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनसह अनेकांना दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने दाऊद आणि टायगर मेमनला फरार घोषित केले आहे. मुंबई बॉम्बस्फोटानंतर हे दोघेही पाकिस्तानात लपून बसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
गेल्या महिन्यात महाराष्ट्र एटीएसने दाऊद इब्राहिमच्या साथीदाराला अटक केली होती. दाऊदचा लहान भाऊ आणि फरारी गुन्हेगार अनीस इब्राहिम याचेही नाव एटीएसने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये आहे. परवेझ जुबेर मेमन (47) याला त्याच्या वर्सोवा भागातील घरातून अटक करण्यात आली होती. अनीससोबतच मेमनही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईतील डी कंपनी आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई सुरूच आहे.