Ravikant Tupkar : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रविकांत तुपकर म्हणाले की, हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्सव आहे. आनंदाचा दिवस आहे. लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद जनतेमध्ये असते. आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे.
या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे. मी अतिशय छोट्या गावातून येतो. एवढ्या छोट्याशा गावातला मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज बुलढाणा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे. जनतेचा भरभक्कम पाठिंबा मला त्या ठिकाणी मिळतो आहे. मी आज मतदानाचा हक्क बजावला. जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटण दाबताना मला प्रचंड आनंद झाला. खूप चांगले वातावरण आहे. जनतेचा पाठिंबा आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, जनतेचं उपकार मी मरेपर्यंत विसरु शकत नाही. जे प्रेम मोठ मोठ्या राजकारण्यांच्या वाट्याला आलं नाही. ते प्रेम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. मी लोकांना काही देऊ शकत नाही पण चळवळीमध्ये 22 वर्ष जो संघर्ष केला त्या संघर्षाची मजुरी देण्यासाठी लोक आज खंबीरपणे माझ्या पाठिशी जनता उभी आहे. कोण कुठे प्रचार करते मला माहित नाही. जनतेनेच ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे. या निवडणुकीत माझा म्हणजे जनतेचा विजय प्राप्त होणार आहे. असे रविकांत तुपकर म्हणाले.