Ratan Tata यांचे पार्थिव अनंतात विलिन
उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हळहळला. महाराष्ट्रात एक दिवसाचा राजकीय दुखवटाही जाहिर करण्यात आला आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यशस्वी उद्योजकाचं उत्तम उदाहरण, परोपकार वृत्ती असणारे दयाळू व्यक्तीमत्त्व, प्राणीमात्रांवर पराकोटीचं प्रेम आणि माणसातलं माणूसपण जपणाऱ्या रतन टाटा अनंतात विलीन झाले. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्याकरता देशभरातील असंख्य लोक मुंबईत दाखल झाले होते. पारशी समाजाच्या विधीनुसार त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विद्युत स्मशानभूमीत त्यांनी अखेरचा निरोप दिला.
टाटा यांचे पार्थिव दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइंट येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) येथे गुरुवारी सकाळी साडेदहा ते दुपारी चार या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीतील स्मशानभूमीत नेण्यात आले. केंद्राच्या वतीने रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि इतर मंत्री आणि अंबानींसारखे उच्च उद्योजकही उपस्थित होते.
संपूर्ण जगासमोर गुणवत्ता आणि सचोटीचा आदर्श निर्माण करणारे... कोट्यवधी मनांवर आपल्या प्रेरणादायी आचार अन् विचारांचा वस्तपाठ कोरणारे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या जाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे.