'मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष कोंबड्यासारखे ‘मातोश्री’वर बसून होते', रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल महाडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना भाजपा-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, या कोकण दौऱ्यावरून आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. एका वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे. त्यांना थोडी जरी वाटली असती तर ते कातळशिल्प बघायला गेले नसते. ती काही चौपाटी नव्हती. मुख्यमंत्री असताना रिफायनरी प्रकल्पसाठी बारसूचं नाव त्यांनीच सुचवलं होतं. त्या प्रकल्पसाठी केंद्र सरकारला पत्रही त्यांनीच दिलं होतं. मग आता ते कोणत्या तोंडाने कातळशिल्प बघायला जात आहेत?” अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.
“उद्धव ठाकरे सुडाच्या भावनेने पेटलेले आहेत. त्यांना एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद घालवायचं आहे. त्यासाठी ते सातत्याने करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री असताना ते अडीच वर्ष कोंबड्यासारखे मातोश्रीवर बसून होते. तेव्हा ते बाहेर पडले नाहीत. मात्र, आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर कातळशिल्प बघायला जात आहेत”, असं ते म्हणाले.