माजी खासदार राजू शेट्टींनी जपला 'स्वाभिमान'; म्हणाले, "मशाल चिन्ह हातात घेऊन..."
"मी आजपर्यंत कोणत्याही पक्षात गेलो नाही, असं असंताना मी मशाल चिन्ह हातात घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वाऱ्यावर सोडू का? मशाल हातात घेणे म्हणजे शिवसेनेत पक्षप्रवेश करावा लागला असता. मी शेतकऱ्यांना सोबत घेऊन चळवळीसाठी लढतोय. सरूडकर यांच्यासोबत कारखानदार उभे आहेत. त्यामुळे 'कारखानदार विरुद्ध शेतकरी' अशी ही निवडणूक आहे. माझ्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत नेते झाले. छगन भुजबळ यांनी प्रस्ताव मांडला होता, त्याला मी अनुमोदन दिलं होतं. पण उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला आहे. संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येऊन शिवसेनेचे काम करतील का ? असा थेट सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
राजू शेट्टी पत्रकार परिषदेत म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली, असं परस्पर सांगितलं जातं होतं. आम्ही तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. भाजपच्या विचारधारेला आम्ही उघडपणे विरोध केला आहे.जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केले. भाजपने शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले, हमीभाव कायदा आणला नाही. दिल्लीत शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेतला, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार होतं. मात्र, त्यावेळी विरोध न करता आता बोलले जात आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम हा शक्तीपीठ महामार्ग करणार आहे.
महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटा अशी विनंती केली. त्यामुळेच मी उद्धव ठाकरे यांना दोनदा भेटायला गेलो होतो. शिवसेना सोडून गेलेल्याना धडा शिकवायचा असेल तर, तुम्ही उमेदवार देऊ नका, असं मी बोललो. कारण शिवसेनेकडे त्या ताकदीचा उमेदवार नाही, मी मतदार संघात काम केलंय.शिवसेना सोडणाऱ्यांना धडा शिकवायचा असेल, तर मला पाठींबा द्या, असं मी म्हणालो. मात्र, शिवसेनेनं अचानक उमेदवार जाहीर केला. उमेदवार जाहीर करण्याच्या काही तास आधी शिवसेना ठाकरे गट माझ्या संपर्कात होता. मला मशाल चिन्हावर लढण्यासाठी ऑफर दिली.
मात्र, मी शेतकऱ्यांची चळवळ कायम ठेवण्यासाठी मी स्पष्ट नकार दिला. राजकारण करायचं असेल तर कधीच राष्ट्रीय पक्षासोबत गेलो असतो. शिवसेनेचे उमेदवार सत्यजित आबा पाटील यांचे वडील हे एक साखर कारखाना चालवतात.त्यामुळे ही निवडणूक शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी होईल. शाहू महाराज यांच्याबद्दल आमच्या भावना वेगळ्या आहेत, कारण शेतकऱ्यांचा प्रश्नावर शाहू महाराज यांनी नेहमी पाठींबा दिला. महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार दिला, तरी कोल्हापूर बद्दल आम्ही विचार करू, असंही शेट्टी म्हणाले.