...म्हणून राज ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना भेटणार; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अ‍ॅक्शन मोडवर

...म्हणून राज ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना भेटणार; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अ‍ॅक्शन मोडवर

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. निवडणूका जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा पहायला मिळत आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. निवडणूका जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा पहायला मिळत आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि राज्यातील इतर पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. त्यामुळे बैठका, दौरे आणि भेटीगाठी यांचे सत्र वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहेत. त्यानंतर आता राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून नागपूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरेंनी किती जागांवर लढणार हे स्पष्टपणे सांगितले आहे.

'मनसेने 2009 मध्ये 230 ते 250 जागा लढवल्या होत्या. आता येत्या निवडणुकीत मनसे 200 ते 225 जागा लढवणार आहे. यासाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करत आहे, असे राज ठाकरे म्हणाले. तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लवकरच भेटणार असल्याच राज ठाकरे यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये झालेलं मतदान नीट समजून घेतलं पाहिजे. भाजपच्या लोकांनीच संविधान बदलणार सांगितल्यामुळे त्यांनाच फटका बसला. लोकसभेला शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या प्रेमापोटी मतदान झालेलं नाही. ती एक वाफ होती, ती लोकसभेला निघाली. आता विधानसभेला गेल्या पाच वर्षात या लोकांनी महाराष्ट्रात जे काही राजकारण केलं, त्याला गलिच्छ राजकारण म्हणता येईल. ते राजकारण लोकं विसरलेली नाहीत. आणि महाराष्ट्रातील लोकं विसरणार देखील नाहीत. याला मतदारांची प्रतारणा करणं म्हणतात, ती राज्यातील मतदारांची झाली. हा सगळा चिखल झाला तो या आधी कधीच झाला नव्हता. असा विचार देखील कोणी केला नव्हता. त्यामुळे या राजकारणाचा राग लोकं येत्या विधानसभा निवडणूकीमध्ये दाखवून देणार आहेत, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावेत म्हणून देशात NDA आणि महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता विधानसभेत राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com