राज ठाकरेंनी वाहिली विक्रम गोखलेंना श्रद्धांजली, लिहली भावुक पोस्ट
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीवरही शोककळा पसरली आहे. सर्वच स्थरावरून अभिनेते विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. आता यावरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विक्रम गोखले यांच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट
मुळात रंगमंच, सिनेमा आणि टेलिव्हिजन ह्या तिन्ही माध्यमांमध्ये सराईतपणे अभिनय करू शकणारे अभिनेते दुर्मिळ. त्यात अनेकदा असं जाणवत आलंय की अनेक अभिनेते जरी तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय करत असले तरी त्यांचा सर्वोत्कृष्ट अभिनय हा कुठल्यातरी एका प्रकारात खुलतो. पण विक्रम गोखले हे ह्याला दुर्मिळ अपवाद होते. तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच. त्यांची संवादफेक उत्तम होतीच पण चेहऱ्यावरचे हावभाव आणि डोळ्यातून देखील बोलण्याची त्यांची हातोटी कमाल होती.
तीन पिढ्यांचा अभिनयाचा वारसा घेऊन आणि तो ही उत्तम अभिनयाचा वारसा घेऊन ह्या क्षेत्रांत उतरायचं आणि स्वतःला सिद्ध करायचं हे कठीण असतं, पण विक्रम गोखलेंना ते सहज पेललं. मला अजून एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे, ते म्हणजे राजकीय भूमिका घेताना कचरत नसत आणि ते कमालीचे धर्माभिमानी होते. त्यांच्या सर्वच भूमिका काही मला मान्य होत्या असं नाही, पण किमान ते भूमिका घ्यायचे हे विसरता येणार नाही.
भूमिका घेताना अभिनय न करणारा आणि अभिनय करताना भूमिका जगणारा हा कलावंत आज आपल्यातून निघून गेला. विक्रम गोखलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन.