Raj Thackeray यांच्या विरोधात जालन्यात तक्रार; 'त्या' शब्दामुळे दुखावल्या भावना
जालना | रवी जैस्वाल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा सोडून हिंदूत्वाची (Hinduism) भूमिका घेतल्यापासून राज्यात एका नव्य वादाला सुरुवात झाली आहे. गुडी पाडव्याच्या सभेपासून सुरु झालेल्या भोंग्याच्या वादात अगदी औरंगाबादेत (Aurangabad) पार पडलेल्या शेवटच्या सभेने देखील तेवढीच भर घातली आहे. राज ठाकरे यांनी काल अल्टीमेटम देत ४ तारखेपासून जर मशिदींवर भोंगे दिसले तर त्यासमोर हनुमान चालिसा वाजवा असा इशारा दिला आहे. तसंच त्यांनी आपल्या भाषणात आक्रमक होत अनेक टीका केल्या. त्यानंतर आता जालन्यात (Jalna) राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अजान शब्दाला बांग म्हंटल्यानं मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम संघटनेने राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटननेने केली आहे. औरंगाबादमधील राज ठाकरेंच्या भाषणादरम्यान अजान सुरु झाली. त्यावेळी 'ही बांग बंद करा असं राज ठाकरेंनी म्हंटलं' होतं.
दरम्यान, अजान या पवित्र कार्याला बांग संबोधून राज ठाकरे यांनी समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळं कलम 298 नुसार राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी तक्रार 'खिदमत ये मिल्लत' या संघटनेनं घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. त्यामुळं आता पोलीस या तक्रारीची कशा पद्धतीनं दखल घेत आहेत हे पाहनं महत्वाचं ठरणार आहे.