मनसेमध्ये इनकमींग होणार? राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य...
राज्यात राजकीय भुकंप झाला, सत्तांतर झालं, सत्तासंघर्ष हा न्यायालयात आहे, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, राज ठाकरे व त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्व राजकारणापासून दूर असल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी या सर्व सत्तापालटावर व आता सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर देखील फारसं बोलणं आतापर्यंत टाळलं आहे. मात्र, आता राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये येणार आहेत. दरम्यान आज राज ठाकरे बैठक बोलवली आहे. या बैठकीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बैठकीला सुरूवात होण्याआधी राज ठाकरेंनी पत्रकारांशी 'ऑफ द रेकॉर्ड' संवाद साधला.
काय म्हणाले राज ठाकरे?
'सध्या डबे जोडण्याचं काम सुरू आहे. म्हणून, रेल्वेने नागपूरला जाणार आहे. आता नवे डबे मागवले आहेत...' असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा अर्थ काय असू शकतो?
'डबे जोडण्याचं काम सुरू आहे':
राज ठाकरे यांचा पक्ष मनसे या पक्षाचं निवडणूक चिन्ह रेल्वे इंजिन असल्याने या वक्तव्याचा अर्थ मनसेच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे असा होतो.
रेल्वेने नागपूरला जाणार आहे:
राज ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाल्यानंतर त्यांनी विदर्भ दौरा आखला आहे. या दौऱ्यासाठी ते नागपूरला रेल्वेने जाणार आहेत.
आता नवे डबे मागवले आहेत...:
राज ठाकरे यांचं चिन्ह रेल्वे इंजिन असल्यानं मनसेतील नेते हे त्या रेल्वेचे डबे आहेत असं म्हणता येईल. त्यामुळे राज ठाकरे यांच्या 'नवे डबे मागवले आहेत...' या वक्तव्यामुळे मनसेमध्ये इनकमींग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोण असु शकतात मागवलेले नवे 'डबे'?
राज्यात राजकीय भुकंप झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर निघालेला शिंदेगट हा कोणत्या पक्षात सामील होणार की, स्वत:चा पक्ष स्थापन करणार असा सवाल उपस्थित केला जात होता तेव्हा शिंदेगटातील आमदार राज ठाकरेंच्या मनसेमध्ये विलीन होतील अशी जोरदार चर्चा सुरू होती. अद्यापही राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल लागलेला नाही. न्यायालयात हा निकाल शिंदेगटाच्या विरोधात लागला तर शिंदेगट मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मागील काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्या नेत्यांच्या राज ठाकरेंशी वाढलेल्या भेटी गाठींमुळे मागवलेले नवे डबे हे शिंदेगटातील आमदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.