व्यवस्थेबद्दल तुमच्या मनात राग का उसळतो? अमेरिकेत मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरे म्हणाले, "माणूस विचाराने तरुण असेल, तर..."
Raj Thackeray Speech : अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्रा मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. भाषणात तुम्ही जेव्हा जाहीरपणे बोलता, तेव्हा तुमच्या मनात व्यवस्थेबद्दलचा राग उसळतो, तो सातत्याने खऱ्या अर्थाने लखलखताना दिसतो. अनेकांचा राग शब्दात असतो, पण तुमचा शब्दांच्या पलीकडे व्यवस्थेच्या विरोधातील राग आहे. इतकी वर्ष तो राग तुमच्या मनात अखंड जिवंत आहे. या रागाचा संबंध तुमच्या तारुण्याशी आहे का आणि तो व्यवस्थेशी किती आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरेंनी मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
याचा तारुण्याशी काहीही संबंध नाही. आमचे आजोबा सांगायचे, माणूस विचाराने तरुण पाहिजे. वय वगैरे या सर्व गोष्टी इकडे तिकडे असतात. पण तो विचाराने तरुण असेल, तर त्याला राग येणं स्वाभाविक आहे. राज ठाकरे पुढे म्हणाले, ज्या गोष्टी आपल्याकडे घडत असतात म्हणजे भारतात लोकशाही आहे असं आपण म्हणतो. पण भारतात लोकशाही नाही. आपल्याला लोकशाहीचा अर्थच कळला नाही. अमेरिकेत जे आहे, त्याला मी लोकशाही म्हणेल. माणूस नुसता सुक्षितीत असून चालत नाही, माणूस सुज्ञ असायला हवा. सुज्ञ असणं तिथे लोकशाही नांदते.
राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर
अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला मी उपस्थित रहावं, अशी विनंती आयोजकांनी केली होती, त्यांचा मान राखून मी सॅन होजेला आलो. यावेळी माझी एक प्रकट मुलाखत पण ठरली होती. २८ जून २०२४ ला अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी माझी मुलाखत घेतली. बऱ्याच काळाने महाराष्ट्राबाहेर पसरलेल्या मराठी जनांना भेटण्याचा योग मला या निमित्ताने आला, अनेकांशी संवाद झाला, ते महाराष्ट्राकडे कसं बघतात हे समजून घेता आलं. आज मुलाखतीच्या निमित्ताने मुलाखतकारांनी अनेक प्रश्न विचारले, प्रेक्षागृहातील उपस्थित प्रेक्षकांच्या मनातल्या काही प्रश्नांना उत्तरं देता आली. यातून त्यांना मी एकूणच राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा विषयांकडे कसं बघतो, हे त्यांना कदाचित पुन्हा एकदा नव्याने समजलं असेल.
पण माझ्या तिथे जमलेल्या मराठी जनांकडून पण काय अपेक्षा आहेत, हे देखील मी प्रांजळपणे मुलाखती दरम्यान मांडलं. आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं भारताबाहेर आहेत, तिथे त्यांनी त्यांचं एक जग उभं केलं, ते तिथे यशस्वी झालेत, या सगळ्या प्रवासात त्यांनी जो अनुभव गोळा केला असेल, जगातील उत्तम कल्पना पाहिल्या असतील, त्या त्यांना महाराष्ट्रात आणाव्यात असं वाटत असेल , तर त्या त्यांनी आणण्यासाठी पूर्ण शर्थीने प्रयत्न करावेत, आणि हे करताना महाराष्ट्रात त्यांनी या राज ठाकरेला गृहीत धरलंत तरी चालेल असं मी आवर्जून सांगितलं. बाकी आज जरी महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन.
यासाठी, तो महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की, महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे २ मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि 'मराठी' म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने पण प्रयत्न केले पाहिजेत हे मी मुलाखतीत सांगितलं. मुलाखतीची लिंक सोबत जोडली आहे...