शरद पवारांवर घणाघाती टीका; दिला स्वबळाचा नारा; निवडणुकीचे रणशिंग फुंकले; पाहा काय म्हणाले राज ठाकरे
राज्यातील सर्व राजकीय पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. निवडणूक आयोगाकडून आता कधीही निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. युती आणि आघाड्यांची जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडीमागे मनसे नेते राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी स्वबळाचा नारा दिला. मुंबईतील गोरेगावमध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यातराज ठाकरे यांनी विविध विषयांवर भाष्य करत चौफेर फटकेबाजी केली आहे.
ते म्हणाले की, या निवडणुकीत ना युत्या, ना आघाड्या आहे. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत. निकालानंतर मनसे हा सत्तेतील पक्ष असेल हे लक्षात ठेवा. ज्यांनी आशा अपेक्षा ठेवल्या आहेत. त्यांना उत्तम महाराष्ट्र घडवून दाखवू. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडवण्याची इच्छा आहे, असे मनसे नेते राज ठाकरे यांनी म्हटले.
शरद पवार यांच्यावर टीका करत म्हणाले की, शरद पवार बोलताना सांगतात की आमचा पक्ष फोडला. मात्र माझा त्यांना प्रश्न आहे की, तुम्ही आयुष्यभर काय केलं? 1978 साली काँग्रेस फोडली. 1991 साली शिवसेना फोडली, नंतर नारायण राणेंचे प्रकरण झालं. त्यामुळे तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी करत आहात. असा सवाल करत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे.
महायुतीत सहभागी झालेल्या अजित पवारांबद्दल मी यापूर्वीच बोललो आहे. मात्र भारतीय जनता पक्ष यांना स्वीकारतो तरी कसा? कारण अजित पवार महायुतीमध्ये सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करतात. तर त्यांना जेलमध्ये टाकण्यापूर्वीच त्यांना थेट मंत्रिमंडळात टाकलं, असा मिश्किल टोला ही त्यांनी लागवला. हे का होतंय. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला गृहीत धरले जात आहे. तुम्ही कोण आहात आणि काय कराल? असे म्हणत मतांपुरता केवळ तुमचा वापर केला जात आहे. असेही राज ठाकरे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेतून पैसे दिले जात आहे. तर मला राज्याच्या राजकारणाचा हेतूच कळत नाही. त्याचा उद्देशचं कळत नाही. तुम्हाला पैसे मागितलेच कोणी? मात्र आज मी तुम्हाला हे लिहून देतो निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला पैसे येतील. मात्र निवडणुका झाल्या की तुम्हाला पैसे येणार नाही, असा दावाही त्यांनी केला आहे.