"देखना है जोर कितना..."; अयोध्येतील संत समाजाचं राज ठाकरेंना आव्हान
दिल्ली : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा सोडून आता हिंदुत्वादाची भूमिका स्विकारली असून, त्यांनी घेतलेल्या या भुमिकेमुळे राज्यातील वातावरण सुरुवातीला चांगलंच ढवळून निघालं होतं. मात्र, आता राज ठाकरेंच्याच अचणीत वाढ होताना दिसतेय. कारण उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार बृज भुषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरेंना माफी अन्यथा अयोध्येत पाय ठेवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. बृज भुषण सिंह यांनी आता राज ठाकरेंना मोठं आव्हान दिलं असून, माफी मागितल्या शिवाय पाय देखील ठेवू देणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे.
राज ठाकरे यांनी यापूर्वी उत्तर भारतीयांना मोठा त्रास दिला असून, त्यांनी माफी मागावी अशी मागणी बृज भुषण सिंह यांनी केली आहे. या संदर्भात आज उत्तर प्रदेशच्या नंदिनीनगरमध्ये मोठा कार्यक्रम बृज भुषण सिंह यांनी केला होता. या कार्यक्रमातून अयोध्येच्या संत समाजानेही बृज भुषण सिंह यांच्या मागणीला अनुमोदन दिलं आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. येत्या 5 जुनला मनेसेने अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला असून कोणत्याही परिस्थितीत अयोध्येला जाणारच यावर मनसैनिक आणि राज ठाकरे ठाम आहेत.
बृज भुषण सिंह यांनी आज राज ठाकरेंना आणखी संधी देतोय असं म्हणत राज ठाकरेंना उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागायची नसेल तर त्यांनी संत समाजाची माफी मागावी असं आवाहन केलं आहे. जर राज ठाकरेंनी माफी मागायची नसेल तर त्यांनी आयुष्यात कधीही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये पाय ठेवण्याचा विचार करु नये. त्यांनी केलेलं पाप त्यांच्या नेहमी लक्षात येईल असं बृजभुषण सिंह म्हणाले.
तर अयोध्येतील संत समाजानेही राज ठाकरेंविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही तर "छटी का दुध याद दिलाएंगे, देखना है जोर कितना बाजु-ए-कातील मे है" असं म्हणत साधुंनी सुद्धा राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे.