आजपासून पावसाच्या जोर पुन्हा वाढणार
आजपासून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज, सोमवारपासून १५ सप्टेंबपर्यंत मुंबई-ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभाग, पुणे-नाशिकसह पश्चिम-उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाडयात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय पूर्व-मध्य अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीजवळ वाऱ्यांची चक्रीय स्थिती आहे. महाराष्ट्रासह ओदिशा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, कर्नाटक किनारपट्टीच्या भागांतही पाऊस होत आहे.
कोकणात पुढील चार-पाच दिवस तुरळक भागांत जोरदार पाऊस कोसळेल. किनारपट्टीच्या भागाला सोसाटयाच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याचे सांगितले जात आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस जोर धरणार आहे. घाट विभागांत मुसळधारांची शक्यता आहे.
मराठवाडयात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात अनेक भागांत मेघगर्जना आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल, अशी माहिती हवामान विभागाने रविवारी दिली.