Lonavala: लोणावळ्यात प्रवाशांचे रेलरोको आंदोलन
Rail Roko At Lonavala: कोरोना साथ येण्यापूर्वी लोणावळा रेल्वे स्थानकावर अनेक एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात होता. मात्र कोरोना कालावधीत अनेक गाड्यांचा थांबा रद्द करण्यात आल्या. कोरोना कालावधीपूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच कोरोना कालावधीपूर्वी लोणावळा-पुणे दरम्यान लोकलच्या 48 फेऱ्या सुरु होत्या. त्या कोरोना कालावधीनंतर कमी करण्यात आल्या आहेत. या लोकल फेऱ्या नियमित सुरु कराव्यात, अशीही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आज नागरिकांकडून सकाळी रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. लोकल फेऱ्या कमी केल्यामुळे शहरातील नागरिक, विद्यार्थी यांसह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. लोणावळा हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. देशातील 75 रेल्वे स्थानकांचा अमृत योजनेंतर्गत विकास केला जाणार आहे. त्यात लोणावळा रेल्वे स्थानकाचा देखील समावेश आहे. जर इथे रेल्वे थांबणार नसतील. लोकल फेऱ्या वाढणार नसतील तर स्थानकाचे रुपडे पालटून उपयोग काय, असा सवाल देखील नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी लोणावळा शहर बंद ठेवण्याची हाक नागरिकांनी दिली आहे.
दरम्यान, लोकलच्या फेऱ्या कमी असल्यामुळे त्यांना लोकलची वाट बघत स्टेशन वर थांबावं लागत आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे सुध्दा लोणावळ्यात थांबत नाहीत. सकाळी दहा नंतर दुपारी तीन वाजता लोणावळा -पुणे लोकल आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. या मागणीसाठी मनसेकडून रेलरोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल न घेतल्यास लोणावळा स्टेशन वरून रेल्वे पुढे जाऊ न देण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला.