सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईस आला वेग; राहुल नार्वेकरांची निवडणूक आयोगाकडे धाव
सोळा आमदाराच्या अपात्रतेच्या कारवाईस आता वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. यावरुनच आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना ही विधीमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याचे समजते आहे.
हा निकाल ठराविक वेळेत देणं गरजेचं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.
राहुल नार्वेकरांनी म्हटले आहे की, प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागेल , तितकाच वेळ हा वाजवी कालावधी असेल. सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे मला वाजवी वेळेत निर्णय घ्यायचा आहे. तो कालावधी किती दिवसांचा असेल हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. असे त्यांनी म्हटले आहे.