Rahul Gandhi : भाजपच्या आदिवीसींविषयीच्या धोरणांवरुन राहुल गांधीची सडकून टीका
विधानसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यात प्रचारांचा धडाका सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची गुरुवारी नंदुरबार येथे सभा झाली. या सभेत राहुल गांधींनी आदिवीसींविषयीच्या धोरणांवरुन भाजपवर टीका केली आहे. तसच राज्यात महाविकास आघाडीला भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन देखील राहुल गांधी यांनी जनतेला केलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की, आदिवासी म्हणजे या देशाचे पहिले मालक आहेत. परंतु भाजपवाले म्हणतात तुम्ही वनवासी आहात. वनवासी म्हणजे जल, जमीन आणि जंगलावर अधिकार नसणे. जमीन अधिग्रहण बिल, पैसा कायदा कुणी आणला होता, हे बघितलं पाहिजे. या बिलांमुळे जंगल, जमीन आणि पाण्याचा अधिकार आदिवासींना दिला. भाजपचं सरकार येताच तुमचे अधिकार हिसकावून घेतले. पुढच्या दहा-पंधरा वर्षांमध्ये जंगल उरणार नाही. त्यामुळे जंगलातून तुम्हाला बाहेर जावं लागेल अस ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, देशामध्ये ८ टक्के आदिवासींची संख्या आहे. शंभरापैकी ८ लोक आदिवासी आहेत. मग आठ लोकांना त्यांचा वाटा मिळतो का? ९० ऑफिसर देशाचं सरकार चालवतात. सरकार १०० रुपये खर्च करीत असेल १० पैसे अधिकारी घेतात. ९० पैकी केवळ एक आदिवासी ऑफिसर आहे. त्या अधिकाऱ्याच्या हतात काहीही नाही. त्याला मागे खेचलं जात आहे, जबाबदाऱ्या दिल्या जात नाहीत. एवढंच नाही तर मोठमोठ्या कंपन्या, मीडिया हाऊसेसमध्ये, उद्योग, व्यवसायामध्ये आदिवासींना संधी मिळत नाही.
आदिवासींना संधी मिळाव्यात यासाठी मी काम करणार आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार आलं तर आदिवासींचं कर्ज माफ करणार आहे. महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकण्यात येणार आहे. याशिवाय बसही मोफत दिली जाईल. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला भरघोस मतांनी विजयी करा, असं आवाहन राहुल गांधी यांनी जनतेला केलं आहे.