"मोदींच्या प्रयोगशाळेतील या नव्या प्रयोगामुळे..."; अग्निपथवरुन राहुल गांधींचा निशाणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 'प्रयोगशाळेतील या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि तरुणांचं भविष्य धोक्यात आलंय अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 'अग्निपथ' (Agnipath) या लष्करी भरती योजनेवर रविवारी केंद्रावर निशाणा साधला. गांधींनी ट्विट केलं की, 'दरवर्षी 60,000 सैनिक निवृत्त होतात आणि त्यापैकी फक्त 3,000 लोकांनाच सरकारी नोकऱ्या मिळत आहेत.' चार वर्षांनंतर अग्नीवीरांसोबत केलेल्या करारानंतर हजारोंच्या संख्येनं निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांचं भवितव्य काय असेल? असा सवाल काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी (Rahul Gandhi) उपस्थित केलाय.
अग्नीपथ या योजनेंतर्गत 17 ते 21 वर्ष वयोगटातील तरुणांना केवळ चार वर्षांसाठी भरती करण्याची तरतूद आहे. त्यापैकी 25 टक्के तरुणांना 15 वर्षे सैन्यात काम करण्याची संधी मिळेल. ही योजना जाहीर झाल्यानंतर देशाच्या अनेक भागांत निदर्शनं झाली. मात्र केंद्र सरकार आपल्या या निर्णयावर ठाम असून, भरती देखील सुरु झाली आहे. 2022 साठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे करण्यात आली आहे.
सैन्यभरतीची अग्निपथ योजना जाहीर करण्यात आल्यानंतर देशाच्या अनेक भागात हिंसक आंदोलनं झाली. या आंदोलनाची धग संपूर्ण देशात पसरली. या आंदोलनात अनेक रेल्वेगाड्यांना आग लावण्यातस आली. अग्निपथविरोधी आंदोलनात आक्रमक तरुण थेट रेल्वे रुळांवर जाऊन बसले होते. त्यामुळं शेकडो रेल्वेगाड्या पूर्णपणे रद्द कराव्या लागल्या होत्या. या आंदोलनात अनेकजणांनी आपले प्राण गमावले होते. तसंच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं होतं.