राहुल गांधींनी चिंतन शिबिरात पक्षाला दिले 4 मंत्र; काँग्रेस कात टाकणार?
राजस्थानमधील उदयपूरमध्ये तीन दिवस चाललेल्या चिंतन शिबिरात काँग्रेसने (Congress) आगामी काळातील वाटचालीबद्दल चर्चा केली. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) काही खास मंत्र देऊन पक्षात प्राण फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. आता राहुल गांधींचे हे मंत्र किती प्रभावी ठरतील, हे येणारा काळच सांगेल. राहुल गांधींच्या भाषणातील खास गोष्टी काय होत्या त्या जाणून घेऊ.
जनतेमध्ये जावं लागणार...
चिंतन शिबिरात राहुल गांधींनी जनतेशी नाते घट्ट करण्याचा मुद्दा उपस्थित केला. आपण लोकांमध्ये गेलं पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. काँग्रेसने जनतेचा विश्वास गमावल्याची जाणीव राहुल गांधींनाही झाल्याचं यावरून दिसून येतं. काँग्रेससोबतचं जनतेचं नातं पुन्हा जोडण्यावरही त्यांनी भर दिला. काँग्रेस ऑक्टोबरमध्ये यात्रा काढणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
निष्क्रीय नेत्यांना संदेश...
राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं की, आपल्याला घाम गाळावा लागेल. एसीमध्ये बसून पक्ष चालवणाऱ्या काँग्रेस नेत्यांना हा संदेश दिल्याचं मानलं जातंय. गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. पंजाबमधील सत्ता सुद्धा काँग्रेसला गमवावी लागली. उत्तराखंडमध्ये अधिक चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र घडलं उलटंच. उत्तर प्रदेशातही पक्षासाठी अत्यंत वाईट स्थिती होती. छत्तीसगढ आणि राजस्थानची सत्ताही निवडणूक होत असलेल्या राज्यांमध्ये पणाला लागल्याने येत्या निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
संवाद वाढवा, तरूणांना पक्षात घेऊन या...
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात संवाद कौशल्य वाढवण्याचा सल्ला दिला. भाजपच्या डिजिटल मोडस ऑपरेंडीशी ताळमेळ साधण्यात काँग्रेस अजूनही भरपूर मागे आहे. त्यामुळेच पक्षाच्या नेत्यांनी नव्या युगातील संवादकौशल्य घेऊन चालावं अशी इच्छा राहुल गांधींनी व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांनी तरुणांना पक्षात घेऊन येण्याचं आवाहनही नेत्यांना केला.
इमेज बिल्डींवर भर देण्याचाही सल्ला...
आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधींनी आपल्या प्रतिमा सुधारण्याचा सल्ला देखील उपस्थितांना दिला. राहुल गांधी म्हणाले की, मी माझ्या आयुष्यात एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. कोणाकडून एक रुपयाही घेतला नाही. मी सत्य सांगायला घाबरत नाही. खुल्या व्यासपीठावरून राहुल गांधींनी स्वत:च्या प्रतिमेबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशाप्रकारे राहुल यांनवी आपल्या इमेज मेकओव्हरवर भर देण्याचा सल्ला दिला.