Bailgada Sharyat | शर्यत बैलगाड्यांची, चर्चा मात्र बक्षीसांच्या जेसीबी, जीप, ट्रॅक्टरची
पुणे : बैलगाडा शर्यतीवरील (Bullock Cart) बंदी उठवल्यानंतर राज्यभरात भव्य-दिव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. पण, सध्या संपूर्ण राज्यभरात एकाच बैलगाडा शर्यतीची चर्चा आहे ती म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील बैलगाडा शर्यतीची. कारणही तसे विशेषच असून या शर्यतीमध्ये बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीपेक्षा बक्षिसांचीच चर्चा रंगली आहे. कारण या स्पर्धेत चषकांसोबतच चक्क जेसीबी, बोलेरी जीप, ट्रॅक्टर आणि 116 दुचाकी बक्षिसे म्हणून देण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर ही स्पर्धा 28 ते 31 मे या कालावधीत होणार असून प्रत्येक दिवशी पहिले बक्षिस दिले जाणार आहे. पहिल्या दिवशी स्मार्ट टीव्ही, दुसऱ्या दिवशी फ्रिज तर तिसऱ्या दिवशी बैल जुंपता गाडा देण्यात येणार आहे. ही सर्व बक्षिसे दीड कोटींच्या वर गेली आहेत. म्हणूनच आशियातील सर्वात श्रीमंत बैलगाडा शर्यत असे याला म्हंटले जात आहे.
जय हनुमान बैलगाडा मंडळ, जाधववाडी यांनी सर्वात श्रीमंत बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले असून 28 ते 31 मे रोजीच्या कालावधी दरम्यान पार पडणार आहेत. परंतु, या स्पर्धेसाठी इतका प्रतिसाद मिळाला की 27 मेपासूनच स्पर्धेला सुरुवात करण्याची वेळ आयोजकांवर आली. या स्पर्धेत 2 हजारांहून अधिक बैलगाड्या सहभागी झाल्या आहेत व त्यातील 1200 बैलगाड्या स्पर्धेसाठी पात्र ठरल्या. यामधील 300 बैलगाड्या आज पहिल्या दिवशी धावल्या. सकाळी 6 वाजल्यापासूनच स्पर्धेला सुरुवात झाली होती. तर 31 मे रोजी अंतिम सामना रंगणार असून यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या स्पर्धेस हजेरी लावणार आहे.