'हा' फलंदाज दुखापतग्रस्त झाला अन् सामना हरलो, पंजाब किंग्जच्या प्रशिक्षकाने दिली मोठी प्रतिक्रिया
लखनऊ सुपर जायंट्सविरोधात झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्ज संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पंजाबच्या पराभवाचं मोठं कारण सांगितलं आहे. बांगर म्हणाले, लियाम लिविंगस्टन दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे लियामला खालच्या क्रमवारीत फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. लियामने टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी केली असती, तर परिस्थिती वेगळी असती.
लियाम लिविंगस्टनला लखनऊ सुपर जायंट्सविरोधात झालेल्या सामन्यात टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी पाठवलं नाही. त्याला फक्त १७ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. त्याचदरम्यान त्याने २ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर २८ धावा केल्या. परंतु, तोपर्यंत सामना हातातून निसटला होता आणि पंजाब किंग्जचा पराभव झाला.
सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत संजय बांगरने प्रतिक्रिया देत म्हटलं, आमची सुरुवात खूप चांगली झाली होती. मयंक यादवला श्रेय दिलं पाहिजे, कारण त्याने आमची भागिदारी तोडली. तो खूप वेगानं गोलंदाजी करतो. त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, त्यामुळे धावा करण्यात अडचणी निर्माण झाल्या. ज्या दिशेला मोठी बाऊंड्री होती, त्याचा प्रयोग त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. त्यामुळे आम्ही सामन्यात मागे पडलो. लियाम लिविंगस्टच्या दुखापतीमुळेही आमचं नुकसान झालं. लियाम नेहमी टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो, परंतु यावेळी परिस्थिती वेगळी होती. या कारणांमुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला.
एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जला २१ धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करून लखनै सुपर जायंट्सने क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन आणि कृणाल पांड्याच्या धडाकेबाज खेळीमुळं १९९ धावांपर्यंत मजल मारता आली. तरीही पंजाबच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.