IPL लिलावात झाला वाद, पण शशांक सिंगने केला नाद; 'असा' बनला पंजाब किंग्जच्या विजयाचा शिल्पकार
आयपीएलच्या १७ व्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा ३ गडी राखून पराभव केला. गुजरातने दिलेलं २०० धावांचं लक्ष्य गाठण्यात पंजाबच्या शशांक सिंगचा सिंहाचा वाटा होता. शशांकने याआधी आरसीबीविरोधात झालेल्या सामन्यातही चमकदार कामगिरी केली होती. आयपीएल २०२४ च्या लिलावातही शशांक प्रकाशझोतात आला होता. शशांकला खरेदी करून पंजाबच्या संघाला पश्चाताप झाल्याचं समोर आलं होतं. परंतु, आता शशांकने बाजी जिंकली असून स्वत:चं कौशल्य सिद्ध केलं आहे.
कसा बनला शशांक सिंग पंजाबचा हिरो?
गुजरात टायटन्सविरोधात झालेल्या सामन्यात संघ जेव्हा कठीण परिस्थितीत होता, तेव्हा शशांक सिंगने वादळी खेळी केली. २०० धावांचा पाठलाग करताना पंजाबने ७० धावांवर ४ विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी शशांकने ६ व्या क्रमांकावर येत फलंदाजी केली आणि २९ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार ठोकून नाबाद ६१ धावांची खेळी केली. शशांकला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच'च्या किताबाने सन्मानित करण्यात आलं.
आयपीएल २०२४ च्या लिलावात नेमकं काय घडलं?
छत्तीसगडचा धाकड फलंदाज शशांक सिंगचं नाव मिनी ऑक्शनमध्ये आलं होतं, तेव्हा इतर कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी पंजाब किंग्जने शशांकला बेस प्राईजवर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. शशांकला खरेदी केल्यानंतर पंजाब किंग्जला निर्णय चुकल्याचं माहित झालं. चुकीच्या खेळाडूला आपण खरेदी केलं आहे, असं पंजाबच्या संघाला वाटलं. कारण या मिनी ऑक्शनमध्ये १९ वर्षांचा आणखी एक शशांक सिंग नावाचा खेळाडू होता. त्यानंतर प्रीती झिंटाने संघ व्यवस्थापनाशी चर्चा करून शशांकला संघात घेण्यासाठी सांगितलं.
पंजाबशिवाय 'या' संघांसाठी मैदानात उतरलाय शशांक सिंग
३२ वर्षाचा शशांक सिंग पंजाब किंग्जच्या आधी राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्ससाठी मैदानात उतरला आहे. परंतु, आयपीएलमध्ये याआधी त्याने चमकदार कामगिरी केली नव्हती. २०२२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करून शशांकने १४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३२ च्या सरासरीनं १६० धावा केल्या आहेत.