भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडकडून पुनीत बालन यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव
पुण्यातील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असलेले पुनीत बालन यांचा भारतीय संरक्षण दलाच्या दक्षिण कमांडच्यावतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे. दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल जीओसीइनसी अजय कुमार सिंह यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
‘पुनीत बालन ग्रुप’ आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ या माध्यमातून पुनीत बालन हे क्रिडा, आरोग्य, कला, सास्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात सामाजिक काम करतात. याशिवाय भारतीय लष्करासमवेत काश्मीर खोऱ्यातही ते काम करीत आहेत. प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला येथे भारतीय सैन्य दल आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ यांच्या सयुक्त विद्यमाने विशेष मुलांसाठी डॅगर स्कूल चालविले जाते. याशिवाय बारामुल्ला, कुपवाडा, अनंतनाग, पहलगाम, पुलवामा, शोपियान, उरी, त्रेनाम, वेन, घुरेश या दहशत ग्रस्त, धोकादायक भागात भारतीय लष्कराच्या सहाय्याने विशेष मुलांसाठी शाळा चालवित आहेत, तसेच राष्ट्रीय सुरक्षा यासाठी देखील ते आर्मी च्या सहकार्याने कार्यशील असतात, याशिवाय पुण्यातील दक्षिण कमानमध्ये भारतीय लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून भारतातील पहिले संविधान उद्यान सुरू करण्यात आले आहे.
भारतीय लष्करासमवेत करत असलेल्या बालन यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना दक्षिण कमांडच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रशस्तीपत्रात पुनीत बालन यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत हे लष्करासमवेतच नागरिकांसाठीही हे एक उदाहरण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पुनीत बालन यांना यापूर्वी भारतीय लष्कराच्या सहसेना तसेच मध्य कमांड यांच्याकडून प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
"भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांड विभागाने दिलेले प्रशस्तीपत्रक ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपल्या देशाचे सरक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यासाठी काम करत मी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत आहे. माझ्या या कामाची दखल घेऊन दक्षिण कमांड विभागाने दिलेले प्रशस्तीपत्रक आणखी जोमाने काम करण्यास ऊर्जा देणारे आहे. या सन्मानाबद्दल मी भारतीय लष्कराचा मनापासून आभारी आहे." असे पुनीत बालन म्हणाले.