Pune University: पुणे विद्यापीठाचा देशबाहेर विस्तार, कतारनंतर आणखी चार देशामध्ये विद्यापीठाचं केंद्र
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता परदेशी विद्यापीठांना देशात येण्यासाठी मुभा देण्यात आली असताना आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशाबाहेर विस्तार करत आहे. कतार येथे सुरू केलेल्या शैक्षणिक केंद्रानंतर आता आणखी चार देशांमध्ये विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली आहे.
देशात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असते. यात आफ्रिकेतील देश, आखाती देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाचे शैक्षणिक केंद्र कतार येथे सुरू करण्यात आले. या केंद्राद्वारे विविध अभ्यासक्रम राबवण्यात येत आहेत.