Pune| Sunil Rasane: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने यांची नियुक्ती
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील रासने यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबरला झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पुढील २ वर्षांकरिता सुनील रासने यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, माजी अध्यक्ष माणिक चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे माजी अध्यक्ष माणिक चव्हाण, माजी उपाध्यक्ष सुनील रासने, विद्यमान उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी आदी उपस्थित होते. सुनील रासने हे ट्रस्टचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
सुनील रासने हे ट्रस्टच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये गेल्या ४५ वर्षांहून अधिक काळ कायमच सक्रिय सहभागी असतात. तसेच कोविड काळात ट्रस्टने केलेल्या मदतकार्यात देखील स्वत: रस्त्यावर उतरुन त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थापनात स्वच्छता, दानपेटी सारख्या विषयात ते स्वत: लक्ष देतात. त्यांच्या आवाजातील गणपती बाप्पाची महाआरती सर्वत्र प्रसिद्ध असून, आजही ते दैनंदिन आरती स्वत: म्हणतात. हसतमुख असलेले आणि मंदिरात कायम उपलब्ध असणारे विश्वस्त म्हणून त्यांची ओळख असून ट्रस्टचे संस्थापक उपाध्यक्ष कै. मामासाहेब रासने यांचा वारसा ते समर्थपणे चालवित आहेत. यापूर्वी दि.१५ सप्टेंबर २०२२ साली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ट्रस्टच्या पुढील १४ वर्षांच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सन २०२२ ते २०२४ याकाळात माणिक चव्हाण यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यावेळी विश्वस्त मंडळात इतर पदभार देखील बदलण्यात आले होते. ते २०२४ ते २०२६ या कालावधीकरिता कायम ठेवण्यात आले आहेत.
सन २०२४ ते २०२६ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, विश्वस्त कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे हे वरील पदांवर कार्यरत राहणार आहेत. बैठकीनंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली.
मागील बैठकीतील निर्णयानुसार १४ वर्षांचे नियोजीत अध्यक्ष
सन २०२२ ते २०२४ याकरिता ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण यांनी कार्यकाळ पूर्ण केला. आता सन २०२४ ते २०२६ अशा दोन वर्षांकरीता ट्रस्टच्या अध्यक्षपदी सुनील रासने, सन २०२६ ते २०३१ या पुढील पाच वर्षांकरीता महेश सूर्यवंशी आणि सन २०३१ ते २०३६ या त्या पुढील पाच वर्षांकरीता हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.