Pune Ganesh Utsav: गणेशोत्सवात पुणे पोलिसांकडून उभारण्यात येणार मदत केंद्र
गणेशोत्सवात मोबाईल चोरांचा सुळसूळाट असतो. गणेशोत्सवादरम्यान चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. तसेच अनेक ठिकाणी या सणानिमित्त मुलींची छेडछाड देखील काढली जाते. गर्दीचा चांगलाच फायदा हे असे चोर घेतात. अशा चोरांवर आणि छेड काढणाऱ्यांवर बंदी घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नागरिकांना सुरक्षित वाटण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असून महिलांसंबंधीत गुन्हेगारी ही संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. लहान मुलींसह मोठ्या महिलांवर अत्याचार होत आहेत. याच्यावर आळा घालावा आणि गणेशोत्सवादरम्यान या घटना होऊ नयेत यासाठी महिलांसोबत छेडछाडीसारखे गैरकृत्य करणाऱ्या व्यक्तीचा फोटो काढून नावासह फ्लेक्सवर लावण्यात येणार आहे.
याचपार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गणेशोत्सवानिमित्त २४ तास ही मदत केंद्र उभारण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून कडक कारवाईचा इशारा देण्यात आला असून गणेशोत्सवाच्या काळात शहरातील मध्य भागात 18 पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान मोबाईल चोरी, महिलांकडील दागिने चोरणाऱ्या चोरट्यांची माहिती घेण्यात येणार आहे.
तसेच विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेतील कर्मचारी तैनात असणार आहेत. गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जनाकरीता मोठ्या मोठ्या मिरवणूका निघतात त्यामुळे रस्ते ब्लॉक होण्याच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत प्रमुख परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात असणार आहे.