"राजाश्रय असल्यामुळे पुणे शहरात ड्रग्जचा मोठा व्यवहार"; संजय राऊतांच्या विधानाला CM शिंदे, राणेंचं रोखठोक प्रत्युत्तर,म्हणाले...
Cm Eknath Shinde And Nitesh Rane On Sanjay Raut : पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पुणे शहरात तरुण पिढी ड्रग्जचं सऱ्हासपणे सेवन करत असल्याचं समोर आलं होतं. पुण्यातील हॉटेल, रस्त्यांवरही तरुण मुलं ड्रग्जचं सेवन करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे. राजाश्रय असल्यामुळे पुणे शहरात ड्रग्जचा मोठा व्यवहार सुरु असल्याचं राऊत म्हणाले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नितेश राणे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
एकेकाळी पुणे हे सामाजिक चळवळीचं केंद्र होतं. पोलिसांनी कारवाया करण्याचं नाटक केलं. पण राजाश्रय असल्याशिवाय, पोलिसांची मदत आणि राजकारण्यांचं पाठबळ असल्याशिवाय पुणे शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा व्यवहार होईल, असं वाटत नाही. ड्रग्ज गुजरातमधून येतं. पुणे शहर ड्रग्जचं केंद्र बनलं आहे. पुणे शहरात पोलिसांकडून फक्त नाटक सुरु आहे. गुजरातमधून इतर राज्यांमध्ये ड्रग्ज नेलं जातं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
ड्रग्ज विकणाऱ्यांवर, ड्रग्ज ठेवणाऱ्यांवर आणि पबमध्ये जिथे ड्रग्ज विक्री करुन तरुण पिढी बर्बाद करण्याचं काम जे करतात, त्यांच्यावर पुण्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरुवात केलीय. सरकार डोळ्यासमोर ही तरुण पिढी बर्बाद होऊ देणार नाही. पूर्णपणे ड्रग्जमुक्त शहरं होत नाहीत, तोपर्यंत अशा कारवाया सुरु राहतील.
काय म्हणाले नितेश राणे ?
राजाश्रय असल्याशिवाय त्यांच्या मालकाचा मुलगा नाईट लाईफ कशी साजरा करु शकतो? राजाश्रय असल्याशिवाय दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह यांच्या खून प्रकरणात त्यांच्या मालकाच्या मुलाचं नाव कसं वगळू शकतो? राजाश्रय काय असंत? हे संजय राजाराम राऊतला जवळून माहित आहे, असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं नाव घेता गंभीर आरोप केले आहेत.