प्राध्यपकानं वर्धा नदीत उडी मारून संपवलं जीवन; तीन दिवसांनी होणार होतं लग्न
वर्धा | भूपेश बारंगे : वर्ध्यातील तळेगाव नजीकच्या वर्धा नदीच्या पात्रात आज सकाळच्या सुमारास काटोलच्या प्राध्यापकाने उडी घेतल्याची घटना घडली आहे. नदीपात्रात उडी घेतलेल्या प्राध्यापकांचं नाव विनोद केशव बागवाले असून, वय 52 वर्ष होतं. त्यांचं येत्या 18 तारखेला लग्न असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. तसेच त्यांच्या नातेवाईकांनी या वृत्ताला दुजोरा दिला. गुरुवारी सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती नदित उडी घेत असल्याचे काहींना दिसल्यानंतर त्यांनी लगेच याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली, माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिष गजभिये हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. गजभिये यांनी तात्काळ मदतीसाठी यंत्रणांना सम्पर्क केला. परंतु वर्धा नदीच्या पात्रात आता अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडल्यानं नदीच्या पात्रात पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे पोलिसांना शोधकार्य करताना अडचणी येत होत्या.
तीन दिवसांनी होतं लग्न
नदीच्या पात्रात उडी घेतलेल्या शिक्षकाचं येत्या 18 तारखेला म्हणजे चार दिवसांनी लग्न होतं. अमरावतीच्या मुलीशी त्यांचं लग्न होणार होतं. सदर प्राध्यापक हे काटोल येथील नबीरा महाविद्यालयात अर्थशास्त्र शिकवत होते. आज त्यांच्या नागपूर येथील राहत्या घरून ते लग्न असल्याने चेहऱ्याला फेशियल करून येतो असं म्हणून निघाले होते. मात्र त्यांनी अचानक तळेगाव नजीकच्या वर्धा नदीजवळ येऊन उडी का घेतली हे अद्यापही कळू शकले नाही.
घटनास्थळी बचाव पथक अत्याधुनिक साधनासह दाखल
घटनास्थळी पाण्यात प्राध्यापकांचा शोध घेण्यासाठी मुख्यालय येथून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते, त्यांनी बोट आणली होती सदर बोट पाण्यात टाकून सुरूच झाली नसल्याने वृत्त लिहेस्तोव शोधकार्य करता आले नव्हते,त्यामुळे अत्यावश्यक वेळी बोटी सुरू होत नसेल तर माणसांना कसे वाचवणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.