प्रियंका गांधींनी ओलांडलं बॅरीकेड, राहुल गांधीही रस्त्यावर; केंद्राविरोधात काँग्रेस आक्रमक
दिल्ली : काँग्रेसकडून आज बेरोजगारी आणि महागाईविरोधात देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. स्वत: राहूल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते रस्त्यावर उतरलेले आहेत. निदर्शंनादरम्यान, पोलिसांनी आज प्रियंका गांधी वड्रा आणि इतर काँग्रेस नेत्यांना दिल्लीतील पक्ष मुख्यालयाबाहेरून ताब्यात घेतलं. पक्षाच्या इतर नेत्यांप्रमाणेच, काळा पोशाख परिधान केलेल्या प्रियंका यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स ओलांडून पलीकडे जात धरणे आंदोलन सुरु केलं. त्यानंतर महिला पोलिसांनी प्रियांका गांधींना उचलून पोलीस वाहनात बसवलं. काही वेळापूर्वी प्रियांकाचा राहुल गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी आमच्या लोकांना फरफटत नेल्याचा आरोप राहूल गांधींनी केला आहे.
राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा आणि पंतप्रधानांच्या घराला घेराव घालण्यापूर्वी पक्षप्रमुख सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार संसदेत पोहोचले होते. सरकारने तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांनी निषेध निषेध नोंदवला. त्यांनी केलेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, त्यांचे लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार संसदेपासून निघणाऱ्या 'चलो राष्ट्रपती भवन' या मोर्चात सहभागी होतील. काँग्रेस कार्यकारिणी सदस्य आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी "पंतप्रधानांच्या घरावाला घेराव" घालावा. मात्र पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत काँग्रेसचे हे प्रयत्न उधळून लावले. अनेक प्रमुख ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. एवढंच नाही तर काँग्रेसच्या मोर्चापूर्वी दिल्लीतील काही भागात जमाव बंदी सारखे निर्णय प्रशासनाच्या वतीने लागू करण्यात आले. याच निर्बंधांचं कारण देत पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली.
काळात महागाई आणि बेरोजगारीवर देशव्यापी आंदोलन सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितलं की, सध्याच्या काळात आपण लोकशाहीचा मृत्यू होताना पाहतोय. भारताने दगड विटा रचून जे बांधलं होतं, ते तुमच्या डोळ्यांसमोर नष्ट होतंय. जे लोक आज हुकूमशाहीविरोधात उभे राहत आहेत, त्यांना लक्ष्य केलं जातंय, तुरुंगात टाकलं जातंय. मारहाण केली जातेय. महागाई वाढली आहे, यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असं राहूल गांधी म्हणाले.