सोनिया गांधी यांच्यानंतर प्रियांका गांधीही कोरोना पॉझिटीव्ह
नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या (Congress) हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना कोरोना (Corona Virus) झाला होता. यानंतर कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. ट्विटरवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे.
प्रियंका गांधी गुरुवारीच लखनऊहून दिल्लीला परतल्या होत्या. दोन दिवसीय नवसंकल्प चिंतन शिबिरासाठी त्या लखनऊला गेल्या होत्या. यानंतर ट्विट करुन त्यांनी कोरोना झाला असल्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, मला कोविडची लागण झाली असून सौम्य लक्षणे आढळली आहेत. मी स्वतःला घरी क्वारंटाइन केलं आहे व सर्व प्रोटोकॉल्सची काळजी घेत आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी केले आहे.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. सोनियांना 8 जूनला तर राहुल यांना 2 जूनलाच बोलावण्यात आले होते. मनी लाँड्रिंगचे हे संपूर्ण प्रकरण यंग इंडियन लिमिटेडशी संबंधित आहे, 2010 मध्ये स्थापन झालेल्या गांधी कुटुंबाच्या मालकीची कंपनी, जी 5 लाखांच्या भांडवलाने सुरू झाली होती. परंतु, ईडीच्या म्हणण्यानुसार, आज कंपनीकडे सुमारे 800 कोटींची मालमत्ता आहे.